कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल – पोलिस निरीक्षक सचिन यादव
——————————————
श्री गणेश उत्सव व पैगंबर जयंतीनिमित्त नागरिकांना पोलीस निरीक्षक यांचे आवाहन
प्रतिनिधी, नळदुर्ग दि.२९ ऑगस्ट
उत्सव साजरा होतोय गर्दीतला, कारण माणूस उभा आहे वर्दीतला… कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल,” अशा प्रभावी शब्दांत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन यादव यांनी आगामी गणेश उत्सव आणि पैगंबर जयंतीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन केले.दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील नळदुर्ग व परिसरात गणेश उत्सव आणि पैगंबर जयंती मोठ्या प्रमाणावर साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रण आणि शांतता समितीच्या बैठका आयोजित केल्या आहेत.प्रत्येक गावामध्ये रूट मार्च करून जनजागृती ही करण्यात आली.
पोलीस निरीक्षक यादव म्हणाले की, नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर, धार्मिक भावना भडकावणाऱ्या पोस्ट टाकू नयेत. डीजेचा वापर करून ध्वनीप्रदूषण वाढवणे टाळावे. प्रत्येकाने कायद्याचे पालन करून सण सौहार्दाने साजरे करणे हीच खरी जबाबदारी आहे.तसेच, पोलिसांकडून मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे, अतिरिक्त गस्त पथके, वाहतूक नियंत्रणासाठी विशेष पथक अशी तयारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कायदा मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
शेवटी, उत्सव हा एकतेचा, सौहार्दाचा आणि सांस्कृतिक जतनाचा असतो. तो गोंधळ घालण्यासाठी किंवा कायदा मोडण्यासाठी नसतो. प्रत्येक नागरिकाने जबाबदार वर्तन करून पोलिसांना सहकार्य करावे.असे आवाहन पोलीस निरीक्षक यादव यांनी केले.