महिला सामाजिक कार्यकर्त्या बाबई चव्हाण यांचा तुळजाभवानी मंदिर संस्थान कडून नवदुर्गा म्हणून सन्मान ; अणदूरच्या शिरपेच्यात मानाचा तुरा
अणदूर, धाराशिव लक्षवेध ( लक्ष्मण नरे)
श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान मार्फत शारदीय नवरात्र महोत्सवात यंदा नऊ दिवस नऊ दुर्गांचा सन्मान हा आगळावेगळा मात्र प्रेरणादायी उपक्रम राबवले जात असल्याने महिला वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे.
या उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उठवणाऱ्या ९ प्रेरणादायी महिलांचा सन्मान आयोजित करण्यात आला आहे. धाराशिवच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येऊन जिल्ह्यातील ९ महिलांची या सन्मानासाठी निवड करण्यात आली असून त्यात अणदूर येथील पौर्णिमा महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापिका व सरस्वती उद्योग समूहाच्या प्रमुख सुजाता उर्फ बाबई लक्ष्मण चव्हाण यांचा समावेश आहे.सुजाता चव्हाण हिने महिला सक्षमीकरण, महिला शिक्षण, सामाजिक समानता, बचत गट, वृक्षारोपण, शैक्षणिक साहित्य वाटप, विविध महिलांना उद्योगासाठी प्रेरणा अशा विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उटवून आदर्श व प्रेरणादायी वाटचाल करून महिलांना सक्षम करण्याबरोबरच निराधार महिला उद्योग उपलब्ध करून त्यांना पाठबळ देण्याचे कार्य सुजाता चव्हाण यांनी जिल्हाभरामध्ये केले आहे.अणदूर सारख्या ग्रामीण भागात हे कार्य करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या अडचणी वरती मात करीत त्यांनी विशाखा समिती, जिजाऊ ब्रिगेड विभागीय अध्यक्ष, महिला सक्षमीकरण समिती यासह विविध पदावरती त्यांनी कार्य केले आहे. अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या नवदुर्गा सन्मानामुळे अणदूरच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा लागला आहे.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून काम मिळवून देणे, महिला सक्षमीकरण, स्त्रीभ्रूणहत्या विरोधी जनजागरण, कौटुंबिक हिंसा, लैंगिक शोषण, दारूबंदी, बालविवाह बंदी, कुपोषण निर्मूलन, किशोरी मुली प्रशिक्षण, शिवण क्लास प्रशिक्षण व महिलांना त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचा व गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून वंचितांना शैक्षणिक आधार देण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे.त्यांच्या सर्व कार्याची दखल घेत श्री तुळजाभवानी देवस्थानच्या वतीने त्यांना नवदुर्गा म्हणून सन्मानित करण्यात येणार आहे. सामाजिक व आर्थिक परिस्थितीवर मात करीत महिलांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची निवड केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.