पोर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत
अणदूर, प्रतिनिधी (लक्ष्मण नरे)
अवघ्या मराठवाड्यात अलीकडच्या दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी व शेतमजुरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने अन्नधान्य आणि शालेय साहित्याचे नुकसान झाले आहे. या संकटाच्या काळात पोर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था, अणदूर (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्त नागरिकांना मदतीचा हात दिला.
या उपक्रमांतर्गत अक्कलकोट तालुक्यातील चुंगी, बोरगाव देशमुख, बदोला खुर्द , बदोला बुद्रुक, काळेगाव शिरशी , अरळी दह्याची आणि पितापूर या गावांमध्ये एकूण ६०० राशन किटचे वाटप करण्यात आले.तसेच मोहोळ तालुक्यात १००० किट आणि धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, कळम या भागांमध्ये १००० किटचे वाटप सुरू आहे.पूरामुळे शालेय साहित्य वाहून गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या वतीने १००० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.
या मदत कार्यावेळी संस्थेच्या सचिव बाबई (सुजाता) ताई चव्हाण, व्यवस्थापक नागेश चव्हाण, गुंज संस्थेचे पदाधिकारी मयूर नागती सर, अजित कांकरिया सर, तसेच स्थानिक प्रशासन व ग्रामपंचायत प्रतिनिधी उपस्थित होते.
पितापूर गावचे तलाठी गणेश फडतरे, चुंगी गावच्या सरपंच सारिका राजू चव्हाण, आरळी दह्याचीचे सरपंच अजय सगट, बदोला गावचे सरपंच राजेश राठोड, बोरगाव देशमुखच्या सरपंच विद्या स्वामी, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुरेश तुकाराम इंगोले (सीआरपी), स्वरांजली पाटील, प्रभावती सकट, सारिका चव्हाण, तुळसाबाई बनसोडे, सुरेखा पात्रे, बिस्मिल्ला जमादार ताई आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
पूरग्रस्त ग्रामस्थांनी या मदत कार्याबद्दल पोर्णिमा महिला बहुउद्देशीय संस्था, अणदूर यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि संस्थेच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली.





