गावाला प्रेरणा मिळण्यासाठी पुरस्कार : गजेंद्र कदम जळकोट रत्नांचा पुरस्काराने गौरव
जळकोट, दि.१६(मेघराज किलजे)
गावातील प्रत्यक्ष क्षेत्रातील व्यक्तींना व विद्यार्थ्यांना आपले स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी पुरस्काराच्या माध्यमातून गावाला प्रेरणा मिळावी. यासाठी जळकोटमधील विविध क्षेत्रातील रत्नांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. असे विचार सरपंच गजेंद्र कदम यांनी मांडले.
भारतीय स्वातंत्र्याच्या शुभ मुहूर्तावर जळकोट गावातील विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन स्वातंत्र्यदिनी झालेल्या कार्यक्रमात गौरविण्यात आले. त्यावेळी नागरिक, विद्यार्थी, ग्रामस्थ, युवक यांच्यासमोर स्वातंत्र्य दिनानिमित्त विचार मांडताना गजेंद्र कदम हे बोलत होते.
जळकोट ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात गावचा मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. प्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सरपंच गजेंद्र कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. त्यानंतर गावातील विविध क्षेत्रातील रत्नांचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील, सरपंच गजेंद्र कदम, उपसरपंच प्रशांत नवगिरे, ग्रामपंचायत सदस्य उज्वला भोगे , सेवानिवृत्त शिक्षक मल्लिनाथ छत्रे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यात पुणे येथील उद्योजक राजेंद्र सोनटक्के यांचा फेटा, शाल, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक जळकोट भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल राजलक्ष्मी किलजे हिचा फेटा, शाल ,सन्मानचिन्ह,५००१ रु.व पुष्पगुच्छ देऊन गुणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर प्रयोगशील शेतकरी पुरस्कार नजीर शेख, युवा शेतकरी पुरस्कार संगमेश्वर पाटील, उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार गणेश अंगुले, संगमेश्वर सगर, उत्कृष्ट टमटमचालक पुरस्कार भाऊसाहेब कदम, प्रामाणिक व्यापारी पुरस्कार माणिक मडोळे, रेकॉर्डब्रेक रक्तदान पुरस्कार सुनील हासुरे यांना देऊन गौरविण्यात आले. गुणवंत विद्यार्थी सुमित सगर, श्रुती हिंडोळे, अस्मिता ठोंबरे , अस्मिता याडगौडा, तनुजा चव्हाण, समृद्धी चुंगे, ऋषिकेश सुरवसे व अंकिता सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला. विविध शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमास गावातील माजी सैनिक, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, तंटामुक्ती सदस्य, विविध कमिट्याचे सदस्य, सर्व शाळेचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, नागरिक , महिला उपस्थित होते.