मुरूम येथील सिध्दय्याप्पा मंदिरात शिवलिंग प्राण प्रतिष्ठिपणा व अभिषेक ; दुर्लक्षित मंदिराचा पाटील परिवाराकडून जिर्णोध्दार
(मुरुम ता.उमरगा)
उमरगा तालुक्यातील स्वातंत्र्यपूर्व काळातील मुरुम येथील सिध्दयाप्पा देवस्थानचा पाटील परीवाराच्या वतीने जिर्णोध्दार करण्यात आला आहे. सुंदर कलाकृतीने साकारलेल्या मंदिरात बुधवारी ष. ब्र. जयमल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते शिवलिंग प्राण प्रतिष्ठापणा व अभिषेक संपन्न होणार आहे. यानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुरूम शहर हे एक ऐतिहासिक शहर म्हणून सर्वदूर प्रचित आहे. शहरात आजही पुरातन काळातील अनेक मूर्ती आढळून येतात. मुरूम शहरात मयूर राजाचा राज्य होते तेंव्हा मुरूम शहराला मयूरपुरम असेही म्हणत असल्याची इतिहासात नोंद आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेल्या पुरातन काळातील व मागील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या मुरुम शहरातील श्री सिध्दयाप्पा मंदिराच्या जिर्णोध्दार करण्यात आला आहे. ४५५० स्क्वेअर फूट वसलेल्या दोन मजली मंदिराचे जिर्णोध्दार, सभामंडपाचे काम काशी, श्रीशैल्यम व उजैन पिठाचे विश्वस्त तथा जिल्हा बँकेचे चेअरमन तथा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बापुराव पाटील व पाटील परिवाराने स्वनिधीतुन करण्यात आले आहे.
मंदिराच्या कामासाठी कर्नाटक राज्यातील बदामी व बनशंकरी येथुन लाल कोरीव दगड व शिल्प मागवण्यात आले आहेत. अप्रतिम कलाकारी असलेल्या देखण्या मंदिरात मंगळवारी (दि.१९) शिवभजन व जागरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर बुधवारी (दि.२०) पहाटे ५ वाजता नारळी मठाचे श्री ष. ब्र. जय मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते शिवलिंग प्राण प्रतिष्ठापणा व अभिषेक संपन्न होणार आहे. यावेळी श्री. म. नि. प्र. राजशेखर महास्वामीजी, विरक्तमठ, नंदगाव, मुरुम येथील चरमूर्ती मठाचे श्री. म. नि. प्र. सिद्धमल्ल महास्वामीजी व केसरजवळगा मठाचे श्री. म. नि. प्र. श्री. विरंतेश्वर महास्वामीजी यांचे आर्शीवचन लाभणार आहे. तर सकाळी ११ पासुन ट्रस्टचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविककांनी लाभ घ्यावा असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी केले आहे.