स्त्री जन्माचे स्वागत करा – विलास गरड ; जळकोट येथील व्याख्यानात सामाजिक संदेश
जळकोट, धाराशिव लक्षवेध दि.३(मेघराज किलजे)
छत्रपती शिवाजी राजेंनी आपल्या स्वराज्यात स्त्रीला मोठे स्थान दिले होते. सध्याच्या सामाजिक विषमतेमध्ये गावागावात स्त्री जन्माचे स्वागत करा. असा सामाजिक संदेश लोक व्याख्यानकार प्रा.विलास गरड यांनी जळकोट येथे व्याख्यानातून दिला.
जळकोट येथील श्री केदारलिंगेश्वर नगर भागातील आदर्श गणेश मंडळ पुरस्काराने सन्मानित जय महाकाल गणेश तरुण मंडळाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त प्रयाग मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी व बॅडमिंटन ग्रुपच्या सहकार्याने लोकव्याख्यानकार प्रा. विलास गरड यांचे कालचे स्वराज्य आजचे मावळे या विषयावर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विलास गरड यांनी स्वराज्यातील मावळे व आजचे मावळे या संदर्भात विचार व्यक्त केले. या व्याख्यानात विविध सामाजिक संदेश त्यांनी दिले.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर गणेश प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्वती कन्या प्रशालेचे सहशिक्षक, साने गुरुजी कथामालेचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित विजयकुमार मोरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच गजेंद्र कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य गणेशराव सोनटक्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोकराव पाटील, महेश कदम, कृष्णात मोरे, अनिल छत्रे, संजय माने, संजय अंगुले, प्रयाग मल्टीस्टेटचे चेअरमन सचिन कदम, डॉ. संजय कदम, ब्रह्मानंद कदम, किरण वाघोले, पंकज पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रकांत स्वामी आदि मान्यवर विचार पिठावर उपस्थित होते.
या व्याख्याना बरोबर गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात नीट परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या राजलक्ष्मी किलजे, टीट परीक्षेत यश मिळवलेल्या ज्योती खंडू चंदे, टीट परिषद यश मिळवलेल्या वैष्णवी विजयकुमार मोरे, येणेगुर येथे भारतीय टपाल खात्यात रुजू झालेली गायत्री धनाजी गंगणे, येरमाळा येथे टपाल खात्यात रुजू झाल्याबद्दल वैष्णवी नामदेव कागे, इटकळ येथे भारतीय टपाल खात्यात रुजू झालेली गौरी टोम्पे , सीईटी परीक्षेत यश मिळवलेल्या सुप्रिया विनोद गंगणे, नळदुर्ग येथील कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्रा. पदावर नियुक्ती झाल्याबद्दल शिल्पा भोसले, दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या गायत्री शिवाजी चुंगे , दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या तनुजा लक्ष्मण चव्हाण, सचिन गंगणे, मनोज सावंत यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. व्याख्यानाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय महाकाल गणेश तरुण मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मेघराज किलजे यांनी केले. कार्यक्रमास गावातील नागरिक, विद्यार्थी, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.