जळकोट : मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त जेष्ठ नागरिक काशिनाथ कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण
जळकोट, धाराशिव लक्षवेध दि.१७(मेघराज किलजे)
जळकोट ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच गजेंद्र कदम यांनी ‘ माझी ग्रामपंचायत माझी जबाबदारी ‘या नव्या उपक्रमांतर्गत एका आर्थिक वर्षात १०० टक्के मालमत्ता कर भरलेल्या नागरिकांमधून मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्याचा मान दिला. हा मान जळकोट येथील ज्येष्ठ नागरिक व ज्यांनी निजाम राजवटीचा काळ पाहिला. असे ज्येष्ठ नागरिक काशिनाथ व्यंकटराव कदम – वाडीकर यांना मिळाला. जळकोट ग्रामपंचायतच्या प्रांगणात काशिनाथ कदम वाडीकर यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती दिनाचे ध्वजारोहण पार पडले.
जळकोटचे सरपंच गजेंद्र कदम यांनी दूरदृष्टी ठेवून गावच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी गोळा व्हावा. मालमत्ता कर वेळेवर भरण्यासाठी ग्रामस्थांना सवय लागावी. हा संकल्प डोळ्यापुढे ठेवून, त्यांनी ध्वजारोहणापासून स्वतः बाजूला राहण्याचा निर्णय घेऊन मालमत्ता कर भरलेल्या नागरिकांतून ध्वजारोहण करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्ताने जळकोट ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण गावच्या सामाजिक सेवेत आपल्या कार्यकाळात भरीव योगदान दिलेले ज्येष्ठ नागरिक व रजाकाराचा काळ अनुभवलेले काशिनाथ व्यंकटराव कदम – वाडीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. प्रथम पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी सलामी देऊन राष्ट्रगीत म्हटले. त्यानंतर महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले.
जळकोट गावचे सरपंच गजेंद्र कदम यांनी ग्रामविकासात नागरिकांचा सहभाग घेऊन घेतलेला हा उपक्रम भावी काळात प्रेरणादायी असल्याच्या भावना अनेक ग्रामस्थांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. या उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. सरपंच पदाची प्रतिष्ठा स्वतः न बाळगता नागरिकाला दिलेला हा मान गाव विकासाला नवे वळण देणारे आहे. एवढे मात्र निश्चित.
या मराठवाडा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमास गावातील आजी – माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, सदस्य, सर्व शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, आरोग्य , महसूल खात्याचे कर्मचारी, माजी सैनिक,युवक ,महिला , नागरिक उपस्थित होते.