अणदूर पत्रकार बांधवांच्या वतीने जेष्ठ पत्रकार दिलीप पाठक व संपादक हुकूमत मुलांनी यांना आदरांजली
अणदूर, धाराशिव लक्षवेध (लक्ष्मण नरे)
पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण करणारी दुःखद घटना घडली आहे. ‘टुडे समाचार’ या यूट्यूब चॅनेलचे संपादक हुकूमत मुलानी यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने शनिवारी (दि.२०) रोजी तसेच ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर याचे शुक्रवारी (दि.१९) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
‘बातमी आरपार दाखवणार टुडे समाचार’ हा आवाज आता काळाच्या पडद्याआड गेला आहे. ग्रामीण भागातील समस्या आणि स्थानिक प्रश्नांना न्याय देण्यासाठी हुकूमत मुलानी यांनी यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली होती. तर ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक नारीकर यांनी दीर्घकाळ पत्रकारितेतून समाजातील अनेक मुद्यांना आवाज दिला होता.
अणदुर येथे दोन्ही पत्रकारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी पत्रकार लक्ष्मण नरे, व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवशंकर तिरगुळे, इंडियन आयडल प्रदेश अध्यक्ष शिवाजी कांबळे यांनी श्रद्धांजलीपर आपले विचार व्यक्त करून या अकस्मात निधनामुळे झालेली पोकळी कधीही भरून न येणारी असल्याचे सांगितले.
व्हॉइस ऑफ मीडिया , जय मल्हार पत्रकार संघ, तसेच अणदूर ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत अणदुरकर, पत्रकार संजीव आलुरे, तालुकाध्यक्ष सचिन तोग्गी, बादशाह (मामा) शेख, खंडू (अण्णा) मुळे, सचिन गुडड, डॉ. हरिदास मुंडे, राम भंडारकवठे, संजय मोकाशे, संतोष मोकाशे,आदींसह ग्रामस्थ व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या दोन्ही पत्रकारांच्या निधनाने जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रातील दोन तेजस्वी ज्योती काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.