जळकोट महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस; आ. पाटील यांच्या सूचनेने अतिवृष्टीचे पंचनामे
जळकोट, दि.२७(मेघराज किलजे)
तुळजापूर तालुक्यातील जळकोट महसूल मंडळात मंगळवार (दि.२६) रोजी रात्री गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला अतिवृष्टीच्या पावसाने कहर करून ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या मंडळात तब्बल दोन तासात ७० मि.मी. पडला आहे. मघा नक्षत्राच्या पावसाने जोरदार तडाखा दिल्याने उभ्या खरीप पिकात पाणीच पाणी आहे. आ. जगजितसिंह पाटील यांच्या सूचनेनुसार जळकोट मंडळाचा अतिवृष्टी मध्ये समावेश करण्यात आला असून, पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
यंदाचा गणेशोत्सव सुरू झाला आहे. या गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला जळकोट महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. यावर्षी मे मध्ये चांगला पाऊस झाल्याने, शेतकऱ्यांनी खरिपाची लवकर पेरणी केली होती. यात सोयाबीन ,उडीद ,मूग, मका, तूर आदि नगदी पिकांची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर केली आहे. मूग व उडीद काढणीला आले आहे. त्यापूर्वीच अतिवृष्टीचा तडाखा दिल्याने शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले आहे. जळकोट मंडळात पावसाने कहर केल्याने, शिवा – शिवारात उभ्या पिकात पाणी थांबले आहे. ओढे – नाले तुडुंब भरून वाहत आहेत. आश्लेषा नक्षत्रांत सतत तीन दिवस दमदार पाऊस पडला होता. तेव्हाही उभी पिके पाण्यात होती. काही प्रमाणात उगाड दिल्यानंतर शेतकरी उडीद व मूग पिकाच्या काढणीला लागला असताना मघा नक्षत्राने जोरदार बॅटिंग केल्याने शेतकऱ्यांच्या हातचे पीक गेले आहे. उडीद व मूग जागेवर वापस आहे. जळकोटपासून जवळ असलेल्या रामतीर्थ येथे आश्लेषा नक्षत्रात ढगफुटी पाऊस झाला होता. त्या ठिकाणचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. परत या ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने झाली आहे. रामतीर्थ तांड्यामध्ये मंगळवारच्या पावसात घराघरात पाणी शिरले होते. रहिवाशांनी रात्रभर जागून रात्र काढली. जळकोट महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.
तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जळकोट मंडळात झालेल्या अतिवृष्टीची तात्काळ दाखल घेतली. त्यांनी भ्रमणध्वनीवरून तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्याशी संपर्क साधून जळकोट महसूल मंडळ अतिवृष्टीच्या यादीत समावेश करण्याचे आदेश दिले. त्यानुसार जळकोट मंडळाचा अतिवृष्टीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आमदार पाटील यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.आ. पाटील यांच्या सुचनेनुसार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. आशिष सोनटक्के यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिक नुकसानीचे व अतिवृष्टी भागाची पाहणी केली. जळकोट येथील शेतकरी मेघराज किलजे व नागनाथ किलजे यांच्या गट नंबर ८६ मधील सोयाबीन व उडीद पिकाचे नुकसान झालेल्या क्षेत्राची पाहणी केली. त्याचबरोबर अरुण पाटील, संगमेश्वर पाटील, बसवराज छत्रे यांच्याही पीक नुकसानाची पाहणी केली. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीक क्षेत्राची माहिती आमदार पाटील यांना आशिष सोनटक्के यांनी दिली.
दरम्यान या अतिवृष्टीने शेतकरी पूर्णतः कोलमडला आहे. सरसकट जळकोट मंडळातील पीक नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना आर्थिक भरीव मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.