जळकोट परिसरात पावसाचा धुमाकूळ; हंगरगा(नळ), येडोळा गावचा संपर्क तुटला
जळकोट, दि.१८(मेघराज किलजे):
जळकोटसह परिसरात गुरुवारी पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने सर्वच गावातील ओढे,नाले तुडुंब भरून वाहत आहेत. शिवारा – शिवारात पाणी उभारले आहे. हंगरगा (नळ) ते जळकोट व येडोळा ते नळदुर्ग या दोन्ही रस्त्याच्या पुलावरून पाणी जात असल्याने गावचा संपर्क तुटला आहे.
तुळजापूर तालुक्यातील मौजे येडोळा येथील येडोळा ते नळदुर्ग जाणाऱ्या रस्त्यावर पहाटे ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडल्याने वड्यावरील पूलावरून पाणी जात आहे. नळदुर्गला जाण्यासाठीचा संपर्क तुटला आहे. वड्यावरील पुलाचे काम लवकरात लवकर करण्यात यावे. अशी मागणी रवी पाटील , सतीश जाधव – पाटील, अनिल जाधव , पप्पू पवार , संतोष पवार व ग्रामस्थांनी केली आहे.
हंगरगा (नळ) गावच्या नजीक असलेल्या मुख्य रस्त्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्क तुटला आहे. सकाळी शाळेसाठी निघालेले गुरुजी पुलावरून पाणी वाहत असल्याने परत फिरल्याने शाळेला जाता आले नाही. एसटी बसेसही अलीकडून पलीकडून बसेस थांबून होत्या. या फुलाची उंची वाढवण्याची गरज आहे. जळकोट व परिसरात ६२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जळकोट परिसरातील विविध गावानाही पावसाने तुफान झोडपले आहे. सोयाबीन, तूर, उडीद, मूग आदि पिके पाण्यात आहेत.
सततच्या पावसामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जळकोट व परिसरात गुरुवारी पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने कहर केल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ होत आहे. शासनाने तातडीने मदत जाहीर करावी. व ओला दुष्काळ जाहीर करावा. अशी मागणी जोर करत आहे.