जळकोट महसूल मंडळात अतिवृष्टी; आ. कैलास पाटील यांच्याकडून पाहणी
जळकोट, दि.२७(मेघराज किलजे)
तुळजापूर तालुक्यातील जळकोट महसूल मंडळात मंगळवार (दि.२६) रोजी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची पाहणी आ. कैलास पाटील यांनी केली. जळकोट शिवारात फेरफटका मारून आ. पाटील यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
जळकोट महसूल मंडळात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला अतिवृष्टीच्या पावसाने जळकोट परिसरात झोडपून काढले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान या पावसाने झाले आहे. उडीद, मूग, सोयाबीन आदि उभे पिके पूर्णतः पाण्यात आहेत. शिवारा -शिवारात पाणीच पाणी आहे. किती पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या नुकसानीची पाहणी आ. कैलास पाटील यांनी केली.
या पाहणी दौऱ्यात आ. पाटील यांनी जळकोट येथील शेतकरी संगमेश्वर पाटील, संतोष सुरवसे, मोहन राठोड आदि शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झालेले पाहून त्यांनी जळकोट तलाठी कार्यालयाचे ग्राम महसूल अधिकारी खमितकर व कृषी सहाय्यक श्री. बनसोडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा करून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आ. पाटील यांनी जळकोटवाडी शिवाराचीही पाहणी केली. यावेळी जळकोटचे सरपंच श्री.गजेंद्र कदम, उबाठा सेनेचे जिल्हा उपप्रमुख डॉ. जितेंद्र कानडे, शेतकरी सेनेचे बाळकृष्ण घोडके, तालुका उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर, जळकोट तंटामुक्त अध्यक्ष यशवंत कदम, जळकोटवाडीचे माजी सरपंच शिवाजीराव कदम, तालुका संघटक कृष्णात मोरे, जळकोट विभाग प्रमुख अनिल छत्रे, राजकुमार पाटील आदि हजर राहून पाहणी केली.