भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थानच्या वतीने किटचे वाटप
अणदूर (लक्ष्मण नरे)
तुळजापूर तालुक्यातील जागरूक देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान समितीच्या वतीने सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे भूम तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संकटकाळात मदतीचा हात पुढे करत श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान समितीने पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
तालुक्यातील सोनगिरी वस्ती, साबळेवाडी, आणि पांढरेवाडी या गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला होता. येथील अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले होते. या पूरग्रस्त कुटुंबांना आधार देण्यासाठी देवस्थान समितीने शिधा किट वाटपाचा उपक्रम राबवला. या किटमध्ये तांदूळ, गव्हाचे पीठ, तेल पॉकेट, साखर आणि बेसन अशा अत्यावश्यक वस्तूंचा समावेश होता. या मदतीमुळे पूरग्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.या मदतकार्याच्या वेळी श्री खंडोबा यात्रा कमिटीचे अध्यक्ष मनोज मुळे, मंदिर समितीचे उपाध्यक्ष अविनाश मोकाशे, सचिव सुनील ढेपे, विश्वस्त शशिकांत मोकाशे, अमोल मोकाशे, पुजारी दिवाकर मोकाशे आणि नवनाथ ढोबळे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. देवस्थान समितीच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.