संभाजीनगर शाळेत पुष्प वर्षाव करत विद्यार्थ्यांनी दिला शिक्षकांना निरोप व नव्याने रुजू शिक्षकांचे स्वागत
जळकोट, दि.२०(मेघराज किलजे)
शिक्षक हा फक्त मार्गदर्शक नसतो तर तो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा दीपस्तंभ असतो. याचे दर्शन जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, संभाजीनगर येथे शनिवारी पाहायला मिळाले. या शाळेचे चार शिक्षक इटकरी निळकंठ, अभिवंत सत्यवान, वनवे दिनकर आणि मुरमुरे गजानन यांच्या स्नेहपूर्ण निरोप समारंभाच्या वेळी संपूर्ण गाव, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक मंडळी यांच्या भावना दाटून आल्या होत्या.शिक्षक शाळेत येताच शिक्षकांवर पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांनी आपल्या लाडक्या शिक्षकांचे स्वागत करत कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेत नव्याने रुजू झालेले शिक्षक सुरेखा राठोड , रेखा साखरे व धनंजय ठोंबरे यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर बदली झालेल्या शिक्षकांचा शाळा व शाळा व्यवस्थापन समिती यांच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते फेटा, शाल व भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला. पालकांनी व माजी विद्यार्थ्यांनीही आपली कृतज्ञता व्यक्त केली. तसेच याप्रसंगी माने व अंगुले परिवाराच्यावतीनेही शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.सत्कार समारंभानंतर विद्यार्थ्यांनी शिक्षकाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी सहकारी शिक्षक रेणुके , चव्हाण व मुख्याध्यापिका महामुनी यांनीही आपले मनोगत व्यक्त करत आठवणींना उजाळा दिला. यानंतर प्रमुख पाहुण्यांनी भाषणातून शिक्षकांच्या कार्याचा गौरव केला. हे चारही शिक्षक गावासाठी शैक्षणिक आदर्श ठरले आहेत. त्यांचे योगदान विसरता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनावर त्यांच्या शिकवणीची छाप कायम राहील.असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.आपले अनुभव सांगताना चारही शिक्षक भावूक झाले. विद्यार्थ्यांचे प्रेम, गावकऱ्यांचा विश्वास आणि सहकाऱ्यांचे सहकार्य यामुळे हा प्रवास सोपा झाला.असे सांगत गावकऱ्यांचे आभार मानले.
या निरोप समारंभ कार्यक्रमास सरपंच गजेंद्र कदम , उपसरपंच प्रशांत नवगिरे, ग्राम पंचायत सदस्य संजय अंगुले, ग्राम पंचायत सदस्य संजय माने, शिक्षक नेते डी. डी. कदम , सेवानिवृत्त केंद्र प्रमुख अंगुले , राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विक्रम पाचंगे, मंगेश सुरवसे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, उपाध्यक्ष शकील मुलाणी तसेच परिसरातील शिक्षक, गावातील पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव आहेरकर यांनी केले तर सूत्रसंचलन धनराज कुडकले यांनी केले.निरोप समारंभानंतर शाळा परिसरात विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. टाळ्यांच्या गजरात व भावनांनी ओथंबलेल्या वातावरणात निरोप समारंभाचा पार पडला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांनी प्रयत्न केले.